Topics
मी पुस्तक बोलतोय निबंध लेखन /पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध.
मुलांनो मी पुस्तक बोलतोय…! माझी जन्मकहाणी खूपच वेगळी आहे, एक लेखक असाच एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता. झाडाखाली विश्रांती घेत असताना त्याला आपले विचार एका पुस्तकामध्ये मांडण्याची संकल्पना सुचली आणि त्या लेखकाने लेखणी उचलली आणि माझ्या जन्माला सुरुवात झाली.
जवळ जवळ एका महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर लेखकाने मला परिपूर्ण बनवण्यासाठी आपले कच्च्या स्वरुपातील लेखन छापखान्यामध्ये पाठवले आणि थोड्याच दिवसात माझा जन्म छापखान्यामध्ये झाला आणि मला परिपूर्ण स्वरूप लाभले. मला लाभलेले सुंदर रूप पाहून लेखक खूप आनंदित झाला, जसे आई वडील आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पाहून आनंदित होतात अगदी तसा.
मला मिळालेला रंग, माझ्या मुखपृष्ठावरील रंगबिरंगी चित्र, माझी मजबूत बांधणी हे सर्व अगदी वाचकाला पाहताक्षणी आकर्षित करणारे होते. छपाई खाण्यातील माझ्या जन्मानंतर माझी रवानगी एका पुस्तक विक्रेत्याच्या दुकानात झाली. दुकानदाराने मला एका काचेच्या कपाटात मी लोकांना दिसेल अशा पद्धतीने ठेवले, त्या पुस्तकाच्या दुकानात रोज सकाळी संध्याकाळी खूप गर्दी असायची.
शाळेतील मुले, शिक्षक, व वाचनाची आवड असलेली ज्येष्ठ नागरिक मंडळी हे सर्व जण मला रोज पाहायचे. कधी कधी मला काचेच्या कपाटातून बाहेर काढून हातामध्ये घेऊन माझी पाने उलगडुन पाहायचे आणि पुन्हा मला त्या कपाटामध्ये आहे त्या ठिकाणी ठेवून द्यायचे.
कधी कधी मला वाटायचे की मी नवीन असल्यामुळे मला कोणी विकत घेत नसेल पण एके दिवशी एक पुस्तक प्रेमी दुकानामध्ये आलाच, तो एक पुस्तक प्रेमी आहे, त्याला वाचनाची खूप आवड आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून सहज ओळखू येत होते. अगोदर त्याने माझ्या बाजूला असलेल्या माझ्या मित्रांवर नजर टाकली आणि नंतर त्याने माझे सुंदर मुखपृष्ठ पाहून दुकानदाराला म्हणाला, “ते पुस्तक दाखवा जरा”. दुकानदाराने पटकन मला कपाटातून बाहेर काढलं आणि त्या ग्राहकाच्या पुस्तकप्रेमीच्या हातामध्ये मला ठेवलं.
माझी सुंदर रचना पाहून पुस्तक प्रेमी खूप आनंदित झाला आणि अखेर त्याने मला विकत घेतलं. मला मनातून खूप आनंद झाला होता कारण अखेर माझी त्या दुकानाच्या कपाटातून कायमची सुटका होणार होती आणि माझ्या पानांवर लिहिलेले सुंदर विचार आता कोणीतरी वाचणार होतं, आता कोणीतरी माझी रोज काळजी घेणार होतं, माझ्या पानांवर लिहिलेल्या विचारांपासून लोकांना आता प्रेरणा मिळणार होती, आणि त्या मिळालेल्या प्रेरणेपासून काहीतरी महान कार्य घडेल आणि माझ्या जन्माचं सार्थक होईल या विचाराने मी आनंदित झालो होतो.
pustakachi atmakatha Essay in Marathi
पुस्तक प्रेमीच्या घरी गेल्यानंतर त्या पुस्तक प्रेमीने आनंदाने मला हातामध्ये घेऊन घरातील सर्व सदस्यांना दाखवलं, आणि तो पुस्तकप्रेमी खुर्चीमध्ये बसून माझ्या पानांवर लिहिलेले लेखन अगदी मनापासून वाचू लागला. वाचन करत असताना तो पेनने काही महत्त्वाच्या वाक्यांना अधोरेखित करत होता.
आपल्या मित्रांमध्ये त्याने माझं खूप कौतुक केलं होतं. वाचन करताना तो मला खूप काळजीपूर्वक हाताळत होता. कधीकधी घराबाहेर जाताना तो मला आपल्या सोबत न्यायचा. पाणी, धूळ, डाग यापासून माझी नेहमी काळजी घ्यायचा. मी चोरीला जाऊ नये म्हणून त्याने माझ्या पहिल्या पानावर स्वतःचे सुंदर हस्ताक्षरात नाव सुद्धा कोरलं होतं.
कुणी माझी मागणी केली तर तो स्पष्ट नकार द्यायचा. माझी मागणी केल्यानंतर तो स्पष्टपणे “अजून माझंच वाचन पूर्ण झालं नाही”. असं म्हणायचा. इतका तो माझ्यावर जीव लावायचा, त्याचं ते माझ्यावरचं प्रेम माझी असलेली आवड पाहून मी अगदी मनातून खुश होतो. कारण मला माझी काळजी घेणारा माझा मालक भेटला होता, पण एक दिवस असा उजाडला ज्या दिवशी माझं सुख काही अशिक्षित, पापी लोकांना पाहवल नाही.
एके दिवशी माझ्या मालकाकडे त्याच्या मित्राने मला वाचण्यासाठी माझी मागणी केली. माझा मालक मला त्याला देण्यास नकार देत होता पण त्याच्या मित्राने खूप विनवण्या केल्या शेवटी दयाळूवृत्तीच्या माझ्या मालकाने मला त्याच्या हाती सोपवलेच आणि मला देताना माझी काळजी घेण्यास सांगितले, पण माझ्या मालकाचा मित्र हा मला शाळेतून घरी जाताना मला बसमध्येच विसरून गेला आणि शेवटी मी एका अडाणी माणसाच्या हाती गेलो.
त्याच्यासाठी माझी किंमत काहीच नव्हती कारण गाढवाला गुळाची चव काय कळणार अशी गत झाली होती. मी हरवलेला पाहून मला खूप वाईट वाटले. शेवटी त्या माणसाने मला एका रद्दीवाल्याला विकले रद्दी वाल्याने माझ्या शरीराचे तुकडे-तुकडे केले. माझी झालेली ही दयनीय अवस्था पाहून मला अगदी रडू कोसळले, माझ्या जुन्या मालकाची त्या क्षणी मला खूप आठवण येऊ लागली होती पण माझा त्याठिकाणी नाईलाज होता.
मित्रांनो आम्ही तुम्हाला जगण्याची योग्य दिशा दाखवतो. चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आम्हीच खरे तुमचे मार्गदर्शक आहोत, त्यामुळे सर्वप्रथम अशिक्षित लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आमची किंमत सर्व लोकांना कळेल. आमची काळजी घ्या आणि सोन्यासारखे आम्हाला आयुष्यभर जपून ठेवा. हा पुस्तकरूपी ज्ञानाचा वारसा असाच पुढे चालू ठेवा.
सूचना: जर तुम्हाला “Pustakachi Atmakatha in Marathi/Autobiography of a book in Marathi” या पोस्ट मध्ये दिलेली पुस्तकाची आत्मकथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.